Relatives Of Missing Travelers Optimistic In Nepal Flood Disaster
यात्रेकरूंचे नातेवाईक आशावादी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या जलप्रलयामध्ये सापडलेले दोन नागरिक नऊ दिवसांनंतर जिवंत असल्याचे समोर आले. यामुळे मुंबईतील बेपत्ता यात्रेकरूंच्या नातेवाइकांनाही आशेचा किरण दिसू लागला आहे. नेपाळमधील त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून पडलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. या पार्श्वभूमीवर बेपत्ता लोकांपर्यंतही अशी मदत लवकरच पोहोचून त्यांनाही घरी परतता येईल अशी आशा आहे.
बेपत्ता यात्रेकरूंच्या चिंतेने नातेवाईक नेपाळ, चीनमध्ये संपर्क मिळून माहिती मिळत आहे का हे तपासत आहेत. प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्याही ते संपर्कात आहेत. मात्र गेल्या ९ दिवसांपासून कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने त्यांची चिंता कमी झालेली नाही. तरीही आता या नातेवाईकांनी जोपर्यंत नकारात्मक बातमी मिळत नाही तोपर्यंत सकारात्मकता सोडायची नाही, अशी भूमिका घेतली आहे.‘वाईट बातमी येत नाही तोपर्यंत आशा कायम आहे,’ अशी भावना काही नातेवाइकांनी व्यक्त केली. तसेच मदतीची व्याप्तीही वाढत आहे, अनेकांची सुटका झाली आहे. त्यामुळे २६ तारखेपासून बेपत्ता असलेल्या आणखी काही नागरिक, यात्रेकरूंपर्यंतही मदत पोहोचण्याकडे लक्ष लागले आहे.