Risk Of Glacial Lake Outburst Floods In Sikkim Administration Alert
हिमसरोवरे फुटून पुराचा सिक्कीमला धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नेपाळ-तिबेटच्या सीमेवर हिमखंड कोसळून अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या विनाशाचा अंदाज अद्याप आलेला नसतानाच, सिक्कीमलाही हिमसरोवरे फुटून पूर येण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सिक्किममध्ये धोका असलेली ४० हिमसरोवरे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १६ सरोवरे सर्वाधिक धोकादायक अशा ‘श्रेणी अ’मध्ये असून, ही हिमसरोवरे फुटून पूर (ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड-जीएलओएफ) येण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. अशा पुरामुळे डोंगरउतारावरील आणि नदीखोऱ्यातील खालच्या भागातील वस्त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सिक्कीममधील अशा सरोवरांवर उपग्रहांच्या आधारे लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती प्रधान सचिव संदीप तांबे यांनी दिली.हिमनद्या वितळू लागल्यानंतर हे पाणी हिमनदीच्या पृष्ठभागावर किंवा आसपासच्या खोलगट भागांत साचते. त्यातून हिमसरोवरांची निर्मिती होते. या सरोवरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यास किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक घटकांमुळे त्यांच्या बांधाला तडा गेल्यास अचानक पाण्याचा विसर्ग होऊन ‘जीएलओएफ’ची स्थिती निर्माण होऊ शकते.
सिक्किममध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये हिमसरोवर फुटून अचानक आलेल्या प्रलयंकारी पुरात किमान ६० जणांचा मृत्यू झाला होता. या आपत्तीत मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. या पुरामुळे मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेले चुंगथांग धरणही पूर्ण उद्ध्वस्त झाले होते.