सोनियांचे आत्मचरित्र ‘हार्परकॉलिन्स’तर्फे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सोनियांचे आत्मचरित्र ‘हार्परकॉलिन्स’तर्फे
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे बहुचर्चित आत्मचरित्र आता ‘ हार्परकॉलिन्स इंडिया ’तर्फे प्रकाशित होणार असून, त्याचा प्रकाशन सोहळा १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी पेंग्विन रँडम हाउस इंडियाने या पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनातून माघार घेतली होती. त्यानंतर हार्परकॉलिन्स प्रकाशनाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त ‘मटा’ने आधीच दिले होते.

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र आधी पेंग्विनतर्फे प्रकाशित होणार होते. मात्र, प्रकाशकाने सुचवलेले बदल सोनिया गांधी यांच्या चमूने अमान्य केल्याचे वृत्त होते. यानंतर, आपण पुस्तकाचे भारतातील प्रकाशक असणार नाही, असे पेंग्विनने स्पष्ट केले होते.
केंद्र सरकारच्या दबावामुळे पेंग्विनने माघार घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील पुस्तकांबाबत अडचण नसते, पण काँग्रेसवरील पुस्तकाबाबत अडथळे येतात,’ असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता.