Two Workers Rescued Alive After Nine Days In Flood Of Trishuli River
नऊ दिवसांनी पाहिले किरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नेपाळमधील त्रिशुली नदीच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून तब्बल नऊ दिवसांनी शुक्रवारी दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात आले. यांत्रिक पर्यवेक्षक कबीर महारजन (४५) आणि फोरमन संजय साह (३०) अशी त्यांची नावे आहेत. महारजन यांना काठमांडूतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. साह यांच्यावर नुवाकोट येथील त्रिशुली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोगद्यात आणखी तीन-चार जण अडकले असण्याची शक्यता साह यांनी व्यक्त केली. अडकलेले असताना त्यांना काही जणांचे आवाज ऐकू आले किंवा त्यांच्याशी संवाद झाला होता. पॉवरहाऊसजवळ आणखी कामगार अडकले असण्याची शक्यता असून, पुराच्या पाण्याच्या लोंढ्याने काही जण आत वाहून गेले असावेत, असे त्यांनी सांगितले. महारजन यांच्या पत्नी हिरा शोभा यांनी बचावकर्त्यांचे आभार मानले. ‘माझ्या पतीला दुसरे जीवन मिळाले आहे. नऊ दिवस अत्यंत वेदनादायी आणि कठीण होते. बचावकर्त्यांनी त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला,’ असे त्या म्हणाल्या.नेपाळी लष्कराच्या नेतृत्वाखालील सुरक्षा कमांडकडून विशेष उपकरणांच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू आहे. नेपाळ-तिबेट सीमेजवळ २६ ऑगस्टला हिमखंड कोसळून आलेल्या आकस्मिक पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे आणि गावांत मोठा विध्वंस झाला.
कृष्णनामाचा जप
साह हे नेपाळच्या मधेश प्रांतातील सप्तरी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. आपत्तीवेळी ते नियंत्रण कक्षात काम करत होते. ‘पुरानंतर इतरांनी पळ काढला. मात्र, सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी मागेच थांबलो. बोगद्यात अडकल्यानंतर नऊ दिवस ‘हरे कृष्ण’ मंत्राचा जप करत होतो,’ असे त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीदिवशी सुटकेनंतर सुरक्षा जवानांना सांगितले.
डीएनए नमुने घेणार
विदिशा : नेपाळ पुरानंतर बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशच्या विदिशातील स्वाती बागरेचा (५०) व रायसेनमधील दोन कामगारांच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाणार आहेत. कॅनडात स्थायिक स्वाती या ७७ सदस्यांच्या गटासह कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेल्या होत्या. रायसेनमधील विशेष राजपूत आणि हिमांशू शाक्य हे कामासाठी नेपाळला गेले होते. आपत्तीनंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
भारताची मदत
भारताकडून २१.५ टन वैद्यकीय तसेच मदत साहित्य घेऊन दोन विमाने गुरुवारी रात्री काठमांडूत दाखल झाली.