Abhishek Sharmas Record fast Century Leads India To Victory In International T20
अभिषेकचे विक्रमी शतक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अभिषेक शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने गुरुवारी मालिकेतील अखेरच्या तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा १२७ धावांनी सहज पराभव केला. यासह भारताने मालिका ३-० ने जिंकली. अभिषेकने तीस चेंडूंतच शतक साजरे केले. कसोटी खेळणाऱ्या देशांच्या फलंदाजाकडून नोंदले गेलेले हे आंतरराष्ट्रीय टी-२०मधील सर्वांत वेगवान शतक ठरले.
अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना झाला. भारतीय संघ ाने तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांअखेर २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. साहजिकच भारतीय संघ अखेरच्या सामन्यात बाजी मारून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यास उत्सुक होता. अभिषेक शर्माच्या तडाखेबंद शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानचा डाव ९४ धावांतच गारद झाला.तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अंगलट आला. अभिषेकने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या तुफानी खेळीमुळे भारताने पहिल्या सहा षटकांतच धावांचे शतक गाठले. क्षेत्ररक्षणाचा निर्बंध उठल्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली. त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वांत वेगवान शतकाच्या बाबतीत रोहित शर्मालाही मागे टाकले. रोहितने ३५ चेंडूंत शतक (वि. श्रीलंका) झळकावले होते.
अभिषेक-संजू यांनी ५९ चेंडूंत १४२ धावांची सलामी दिली. अभिषेकला तोलामोलाची साथ देणाऱ्या संजूनेही मालिकेतील दुसरे अर्धशतक साजरे केले. हे दोघे खेळपट्टीवर असताना भारतीय संघ अडीचशेचा टप्पा पार करणार असे वाटत होते. मात्र, हे दोघे परतल्यानंतर भारतीय फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. अखेरीस भारताला सव्वादोनशे धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
धावफलक
भारत : संजू सॅमसन झे. रशीद खान गो. अझमतुल्ला ओमरझाई ५०, अभिषेक शर्मा झे. रहमानउल्ला गुरबाझ रशीद खान १०८, तिलक वर्मा धावबाद २, श्रेयस अय्यर धावबाद २९, शिवम दुबे झे. रशीद गो. ओमरझाई १४, ईशान किशन धावबाद १०, नितीशकुमार रेड्डी झे. मुजीब उर रहमान गो. अब्दुल्ला अहमदझाइ १, अक्षर पटेल नाबाद ५, रवी बिश्नोई नाबाद ०; अवांतर - २; एकूण - २० षटकांत ७ बाद २२१