लाखभर ‘सेमिकॉन कुशल’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
लाखभर ‘सेमिकॉन कुशल’
‘सेमिकॉन इंडिया मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात (१.०) दहा वर्षांत ८५ हजार डिझाइन अभियंत्यांना सेमिकॉन उद्योगासाठी प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ७० हजार जणांना प्रशिक्षित केले आहे. आता सेमिकॉन इंडियाच्या दुसऱ्या टप्प्यात (२.०) एक लाख पात्र उमेदवारांना सेमिकॉन कुशल करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे,’असा निर्धार माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.

राजधानी दिल्लीत सुरू झालेल्या ‘सेमिकॉन इंडिया, २०२६’ या परिषदेच्या उद्घाटन सत्रात मंत्री वैष्णव यांनी वरीलप्रमाणे निर्धार व्यक्त केला. पंतप्रधानांचा वाढदिवस आणि विश्वकर्मा जयंती असा दुग्धशर्करा योग या परिषदेच्या निमित्ताने जुळून आला आहे, अशी पुस्तीही वैष्णव यांनी या वेळी जोडली.
सेमिकॉन इंडियाच्या पहिल्या टप्प्यात १०५ स्टार्टअप सहभागी झाले होते, याकडे मंत्रिमहोदयांनी लक्ष वेधले. ‘अनेक दशकांपासून देशाला सेमीकंडक्टर उद्योगाची गरज होती,’ असे वैष्णव म्हणाले. त्यातही आता कारखान्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची सर्वाधिक गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर सरकारचा सर्वाधिक भर राहणार आहे. याला सेमिकॉन २.० मोहिमेमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.

यासाठी विविध शिक्षण संस्थांना पुढे येण्याचे आवाहन करतानाच शिक्षणसंस्था आणि उद्योग यांनी हातात हात घालून तरुणांमध्ये सेमीकंडक्टरसाठी कौशल्यविकास करावा, असे आवाहनही वैष्णव यांनी केले.

सेमिकॉन २.० चे सहा स्तंभ

डिझाइन : चिपचे डिझाइन नेमके कसे करावे, यासाठी किमान २०० स्टार्टअपना मार्गदर्शन करणार

मशिन्स अँड मटेरियल्स : केवळ फॅब्रिकेशन प्रकल्पापुरता मर्यादित विचार नसून, देशात संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करणार

फॅब : अधिक डिस्प्ले, मेमरी, सिलिकॉन, कम्पाउंंड आणि लॉजिक फॅब्रिकेशन प्रकल्पांची उभारणी करणार

पॅकेजिंग : अत्याधुनिक पॅकेजिंग युनिट उभारणार. यापैकी एक युनिट ओडिशामध्ये लवकरच कार्यान्वित होणार

आर अँड डी : उद्योगाला लागणारे संशोधन व विकास यांना चालना देणार. त्यासाठी उद्योग आणि शिक्षणसंस्था यांना एकत्र आणणार

टॅलेंट : तरुणांच्या गुणवत्तेला सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाची झळाळी आणणार. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सेमीकंडक्टरची चाचणी घेऊन त्यांना सुधारणा सुचवणार.