रुग्णसुविधांवर भर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रुग्णसुविधांवर भर
अपुऱ्या उपचार सुविधांमुळे गैरसोयीचे ठरणारे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता कात टाकणार आहे. राज्य सरकारच्या मूलभूत सुविधा विकासाच्या विशेष योजनेअंतर्गत सुमारे ५५ कोटी ३१ लाख ८४ हजार रुपये खर्च करून या रुग्णालयास नवी झळाळी देण्यात येणार आहे. या सुधारणांसाठी ठाणे महापालिकेने निविदा काढली असून, या कामात केवळ इमारतीची डागडुजी न करता संपूर्ण इमारतीमधील आरोग्य सुविधांमध्ये नव्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

नवीन वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, बालरुग्ण व मातांसाठी विशेष सुविधा, डायलिसिस, दिव्यांगांसाठी ओपीडी, पॅलिएटिव्ह केअर यांसह रुग्णालयातील विद्युत, वातानुकूलन, अग्निसुरक्षा आणि नर्स कॉल यंत्रणेसारख्या सुधारणांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कळवा रुग्णालयाच्या सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता, रुग्णांच्या रांगा, स्वच्छता कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, उपचारासाठी लागणारा विलंब, अपुऱ्या सुविधा, असंवेदनशील सुरक्षा व्यवस्था आणि गलिच्छ परिसर अशी ओळख असलेल्या कळवा रुग्णालयातील दुरवस्थेबद्दल ठाणेकरांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असली तरी आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचा आधार ठरत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधांची स्थिती सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता सातत्याने व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विशेष निधीतून या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत.

या रुग्णालयात स्ट्रक्चरल रिपेअर, आरसीसी, सिव्हिल कामे, पार्टिशन, फरशी, फॉल्स सीलिंग, साइनेज, वॉटरप्रूफिंग, रंगकाम आणि अंतर्गत सजावट केली जाणार आहे. त्यासोबत प्लंबिंग, अग्निशमन यंत्रणा, फायर अलार्म, फर्निचर आणि ईटीपी प्लांटची कामेही प्रस्तावित आहेत. विद्युत कामांमध्ये प्रकाशयोजना, एअर कंडिशनिंग, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम, नर्स कॉल सिस्टम आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टमचा समावेश केला जाणार आहे.