Indian Chess Teams Battle For Victory In The Olympiad
वैशाली, प्रज्ञानंद यांची विजयासाठी झुंज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत).
डाकेबाज खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निहाल सरीन याच्या अब्दुल हाफिजवरील विजयामुळे भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये गुरुवारी पुरुष गटात इंडोनेशियावर २.५- १.५ असा निसटता विजय मिळवला. महिला संघाने फिनलँडच्या संघाला ३.५ -०.५ असे सहज पराभूत केले. तरीही जगज्जेतेपदाची आव्हानवीर वैशालीला अनास्तासिया किनमन हिने शेवटपर्यंत झुंजवून बरोबरी साधली. वैशालीचा भाऊ प्रज्ञानंदलाही इंडोनेशियाच्या अनुभवी ग्रँडमास्टर मगारांतो सुसांतोने ७९ खेळीच्या प्रखर झुंजीनंतर बरोबरीत रोखले.काही वर्षांपूर्वी जगज्जेता अनातोली कार्पोव म्हणाला होता की, ‘जगज्जेता म्हणून खेळण्यात एक मोठा तोटा असतो की सगळे तुमच्या विरुद्ध जीव तोडून खेळतात.’ गेल्या ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला या दोन्ही गटांत सुवर्णपदके मिळवणाऱ्या भारतीय संघाना याचा अनुभव दुसऱ्याच फेरीत आला. इंडोनेशियाच्या ५२वे मानांकन मिळवणाऱ्या संघाने दुसऱ्या मानांकित भारताला जोरदार लढत दिली.
निहाल सरीनने आपल्या लौकिकास साजेसा आक्रमक खेळ करून आंतरराष्ट्रीय मास्टर अरिफ अब्दुल हाफिज ला ३७ चालीत शरण आणले; परंतु इंडोनेशियाच्या बाकी खेळाडूंनी कौतुकास्पद लढत देऊन प्रज्ञानंद , जगज्जेता गुकेश आणि विदित गुजराथी यांना बरोबरीत रोखले.
पहिल्या फेरीत काही सेकंद उरलेले असताना चित्तथरारक विजय मिळवणारी वंतिका अग्रवाल सफाईदार खेळ करून केवळ २२ चालींत विजयी झाली. सिसिलियन बचावाच्या डावात हल्ले प्रतिहल्ले चालू असताना फिनलँडच्या सारा ऑलिव्हियाने १८व्या चालीत उंट चुकीच्या ठिकाणी हलवला आणि वंतिकाने पटाच्या मध्यात आक्रमण करून त्यानंतर अवघ्या ४ चालींत साराला शरण आणले.
पहिल्या डावात विश्रांती घेऊन आज फिनलंड विरुद्ध खेळणाऱ्या दिव्या देशमुख हिने योहाना पासिकांगास विरुद्ध चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. योहानाने स्वतःच्या राजाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा तिला पश्चात्ताप होत असेल. आशियाई विजेत्या सविताश्रीने आपला दुसरा विजय मिळवताना आक्रमक खेळ केला. सविताश्रीचे हे पहिलेच ऑलिम्पियाड आहे आणि ती दडपण न घेता खेळत आहे ही कौतुकाची गोष्ट आहे.
जगज्जेतेपदाची लढत दोन महिन्यांवर आली असताना गुकेशला आपला फॉर्म सापडत नाही ही, निव्वळ त्याच्याच नव्हे तर समस्त भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने काळजीची गोष्ट आहे. चौथ्या पटावर तेवढे अव्वल दर्जाचे खेळाडू नसतात; पण गुकेश तेथेही चाचपडत खेळताना दिसतो. आपल्या महिला संघाची कामगिरी समाधानकारक आहे; पण अजिंक्यपद राखण्यासाठी पुरुष संघाने दडपणाशिवाय खेळ करणे जरूरी आहे.
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत).