राहिले दूर ‘घर’ माझे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
shooting team expresses discontent over management the trouble of 50 km distance
‘राहिले दूर घर माझे...’ असे नाराजीने म्हणण्याची वेळ ३० सदस्यीय भारतीय नेमबाजी संघावर आली आहे. कारण, नेमबाजांचे निवासस्थान आणि सरावाचे ठिकाण यातील अंतर ५० किलोमीटर आहे. संघाच्या वरिष्ठ प्रशिक्षकांनीच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. साहजिकच नेमबाजांना सराव; तसेच स्पर्धास्थळी ने-आण करण्यासाठी बराच वेळ लागत आहे.

‘आम्ही बऱ्याच अपेक्षा आणि सकारात्मक विचारांसह जपानमध्ये दाखल झालो; मात्र येथील व्यवस्था आणि व्यवस्थापन तसे नाही. यजमान देशाची प्रतिमा वेगळी आहे; पण प्रत्यक्ष आयोजन त्यास साजेसे वाटत नाही. भारतीय नेमबाज रेंजपासून ५० किलोमीटर दूर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये उतरले आहेत,’ असे भारताच्या प्रशिक्षकांनी सांगितले.
भारतीय संघात दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती ईशासिंह यांच्यासारखे पदकाचे अनेक दावेदार आहेत; मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे खेळाडूंना रोज थकवणाऱ्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.

‘खेळाडूंची सरावासाठी ने-आण हीच मोठी समस्या आहे; पण आपण काय करू शकतो? नेमबाजी रेंजच्या आसपास कोणतेही हॉटेल नाही. तसे हॉटेल असते, तर आम्ही आधीच तिथे पोचलो असतो. आम्हाला बरेच दूरचे हॉटेल देण्यात आले आहे,’ असेही प्रशिक्षक म्हणाले. या प्रशिक्षकांनी आपल्या कारकिर्दीत आशियाई क्रीडा स्पर्धा; तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

भारतीय नेमबाजी संघटनेसमोर म्हणजेच ‘एनआरएआय’समोर प्रशिक्षकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘याविषयी ‘एनआरएआय’ने एशियाडच्या आयोजकांशी चर्चा केली असेल, असे मला वाटते. मी महासंघाशी थेट बोललो नाही; मात्र या मुद्द्याबाबत त्यांना माहिती दिली आहे,’ असेही प्रशिक्षकांनी सांगितले.