भाविकांच्या श्रद्धेचे स्थान अन् सामाजिक अधिष्ठान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भाविकांच्या श्रद्धेचे स्थान अन् सामाजिक अधिष्ठान
मुंबईतील सिद्धिविनायकाप्रमाणेच कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील सिद्धिविनायकाचे मंदिरही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात नियमितपणे धार्मिक उपक्रम होतातच, शिवाय विश्वस्त संस्थेने गेल्या काही वर्षांपासून त्याला सामाजिक सेवा प्रकल्पांची जोड दिली आहे. स्थानिक क्रिएटिव्ह ग्रुपने या परिसरातील गरज ओळखून उभारलेल्या श्री महागणपती रुग्णालयास सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने भरीव देणगी दिली. त्याचबरोबर मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्षभर नियमितपणे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. रुग्णांना दुर्धर आजार आणि शस्त्रक्रियेसाठी ट्रस्टतर्फे आर्थिक मदतही केली जाते.

ट्रस्ट संचालित गणेश शिक्षण प्रसारक मंडळाने एमटीडीसीने दिलेल्या चार एकर जागेत शालेय इमारत बांधली. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांची सोय झाली. पूर्वी इथे केवळ जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असणारी शाळा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून रेल्वे स्टेशन परिसरात जावे लागायचे. गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असून, दीड हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.
टिटवाळा मंदिर सुशोभीकरण प्रकल्पात तलावाभोवती बांधलेल्या मार्गिकेचा उपयोग स्थानिक रहिवासी सकाळी प्रभातफेरी तसेच योगासने करण्यासाठी करतात. पूर्वी मंदिराच्या आवारात धर्मशाळा होती. तिचे रूपांतर आता मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. गृहरक्षक दल प्रशिक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांच्या सोयीसाठीही या कार्यालयाचा उपयोग केला जातो. मंदिराच्या छतावर सौर पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीजबिलात बरीच बचत झाली आहे.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या सहकार्याने टिटवाळ्याजवळील रुंदे गावाजवळ मंदिर ट्रस्टच्या वतीने निसर्गायन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सिद्धिविनायक ट्रस्टने साडेबारा एकर जागा उपलब्ध करून दिली असून, त्यात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जात आहे. तीन एकर जागेत देवराई साकारली जात आहे. देवराईत आतापर्यंत अकराशे झाडे लावण्यात आली आहेत.

या प्रकल्पात एक बारव (पारंपरिक विहीर) खोदण्यात आली असून, त्याला चांगले पाणीही लागले आहे. निसर्गायन प्रकल्पाला बारवचा उपयोग होणार आहे. या प्रकल्पाच्या एक एकर जागेत तळे असणार आहे. टप्प्याटप्प्याने प्रकल्प साकारण्यात येत आहेत.