तेजल, वृंदाची झुंज; भारत ‘अ’ची हार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tejal and vrindas clash india a teams defeat
मुंबई :

न्यू चंडीगड : वृंदा दिनेश आणि तेजल हसबनीस यांनी झुंज दिली. मात्र, अखेर भारत महिला ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात आठ धावांनी हार पत्करावी लागली. यासह ऑस्ट्रेलिया महिला ‘अ’ संघाने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया ‘अ’ - २० षटकांत ५ बाद १६८ (अनिका लिअरॉयड ६१, कर्टनी वेब ५२, सायली सातघरे २-२५, वैष्णवी शर्मा २-३२) वि. वि. भारत ‘अ’ - १९.५ षटकांत सर्व बाद १६१ (वृंदा दिनेश ६९, तेजल हसबनीस ४२, सिमरन बहादूर नाबाद १५, तायला ३-२४, लिली मिल्स ३-४०).
मेस्सीचे ‘शतक’

मायामी : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने इंटर मायामीकडून खेळताना आपला शंभरावा गोल नोंदवला. त्याने आणि कॅसेमिरोने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर मायामी संघाने क्रूझ अझूल संघावर २-० अशी मात केली आणि कॅम्पेवन्स कप उंचावला. मेस्सीने २४व्या मिनिटाला मायामी संघाचे खाते उघडले. त्याचा हा मायामीकडून खेळलेल्या ११५ सामन्यांतील शंभरावा गोल ठरला. त्यानंतर अखेरच्या कॅसेमिरोने गोल नोंदवून मायामी संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखून मायामी संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

बीसीसीआयची बैठक

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची शुक्रवारी ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यात अंदमान आणि निकोबार क्रिकेट असोसिएशनला सहयोगी सदस्यत्व देणे आणि आयसीसीमध्ये बीसीसीआयच्या प्रतिनिधीची नियुक्ती हे मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये कार्यकारिणीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्याबाबतही विचार केला जाईल.

‘बंगाल’ने संधी दवडली

अम्मान : ईस्ट बंगाल क्लबला ‘एएफसी चॅम्पियन्स लीग टू’मधील ड गटाच्या फुटबॉल लढतीत अल हुसेन क्लबविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. रामिरेझ आणि अन्वर अली यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर ईस्ट बंगाल संघाने मध्यंतराला २-० अशी आघाडी घेतली होती.