मनोरुग्णालयातील कामगारांना दिलासा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मनोरुग्णालयातील कामगारांना दिलासा
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील ६८ सफाई कामगारांच्या बँक खात्यात सहा महिन्यांच्या वेतन फरकाची दुप्पट दंडासहित रक्कम ५८ लाख रुपये रुग्णालय प्रशासनाने सोमवारी जमा केली. कामगारांसाठीच्या श्रमिक जनता संघ युनियनच्या लढ्यास अखेरीस यश प्राप्त झाले आहे.

किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जात नसल्याने, श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी गेल्या २ वर्षांपासून मोर्चा, धरणे, निदर्शने आणि २८ दिवसांचे साखळी उपोषण अशा विविध प्रकारे लढा दिला. ठाणे औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. यासंदर्भात रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदाराने न्यायालयाचे आदेश न पाळल्याने संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी ६८ कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाच्या थकीत रक्कम वसुलीसाठी ठाणे कामगार उपायुक्त कार्यालयात किमान वेतन अधिनियमांतर्गत वसुली दावा दाखल केला. वसुली दाव्याच्या प्रक्रियेनंतर, सहायक कामगार आयुक्तांनी सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाची एकूण दंडासहित दुप्पट रक्कम ५८ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. लवकरच उर्वरित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
कायमस्वरूपी कामात कंत्राटीकरण रद्द होणे, कामगारांना योग्य वेतन व भत्ते हक्क म्हणून मिळणे आदी मुद्दे अद्याप बाकी असून, त्यासाठी कसून लढण्यास युनियन कटिबद्ध आहे, असे युनियनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी जाहीर केले आहे. रुग्णालयातील कर्मचारी व श्रमिक जनता संघ युनियनचे संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत, शर्मिला लोगडे, संजय सेंदाणे, सोनी चौहान आदी कार्यकर्त्यांनी या लढ्यात सातत्याने विशेष परिश्रम घेतले.