44 Thousand Mba Admissions In Maharashtra Increase Of 2111 For Academic Year 2026 27
‘एमबीए’ला ४४ हजार प्रवेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या आणि संस्थात्मक फेरी राबविण्यात आली. त्यानुसार राज्यातील एकूण ४१२ एमबीए-एमएमएस महाविद्यालयातून या अभ्यासक्रमाच्या एकूण ५६ हजार ९३१ उपलब्ध जागेपैकी ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
गेल्या वर्षी सन २०२५-२६ मध्ये ४२ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानुसार गेल्या वर्षापेक्षा २१११ जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यात यंदा एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी दोन जुलै रोजी सुरू होऊन १९ जुलै रोजी संपली. यंदा ५७ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ४१२ एमबीए-एमएमएस महाविद्यालयामध्ये ५६ हजार ९३१ जागा उपलब्ध आहेत. यापैकी संस्थात्मक फेरीअखेर ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या, संस्थात्मक फेरीअखेर शिल्लक राहिलेल्या ‘एकॅप’मधील ११ हजार, व्यवस्थापन कोट्यातील ११४३ अशा एकूण १२ हजार १४३ जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत, असे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.