लष्करी साहित्यासाठी स्टार्टअपना प्रोत्साहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian army encourages startups investment in advanced technology
‘लष्कराकडील साहित्य खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत करण्यासाठी स्टार्टअपना प्रोत्साहन दिले जात आहे,’ अशी माहिती लष्कर उपप्रमुख (माहिती प्रणाली आणि तंत्रज्ञान) लेफ्टनंट जनरल विपुल सिंघल यांनी शुक्रवारी दिली.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) आयोजित ‘आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन नेक्सस ऑफ डिजिटायझेशन, इंटेलिजन्स अँड ॲप्लिकेशन्स’च्या उद्घाटन सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सिंघल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘एआय, डिसीजन सपोर्ट सिस्टीम, इंटेलिजन्स फ्युजन, ड्रोन्स आणि ऑटोनॉमस सिस्टीम्स यांसारख्या विविध अत्याधुनिक क्षेत्रात लष्कर वेगाने काम करीत असून, याद्वारे नागरी आणि संरक्षण अशा दोन्ही क्षेत्रांना फायदा होईल. याशिवाय लष्कराकडील साहित्य खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत करण्यासाठी स्टार्टअपना प्रोत्साहन दिले जात असून, ‘आयडेक्स’ प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानांना जलद गतीने सामावून घेतले जात आहे.’
‘ भारतीय लष्कर विद्यमान तांत्रिक परिवर्तनावर विशेष भर देत आहे. लष्कराने भविष्यातील युद्धासाठी सर्व प्रकारे, विविध क्षेत्रांमध्ये तयार असले पाहिजे, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत,’ असेही सिंघल यांनी या वेळी सांगितले.