Laborer Murder Over 2000 Rupees Accused Caught In Delhi
दोन हजारांसाठी मजुराचा खून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अवघ्या दोन हजार रुपयांच्या वादातून मजुराचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या हात-पायांना दगड बांधून मृतदेह तलावात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोन आणि गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपीला दिल्लीतील गाझीपूर येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास (वय २०, सध्या रा. गाझीपूर, दिल्ली; मूळ रा. बारासात, पश्चिम बंगाल) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, रा. दुधाळे वस्ती, लवळे, मुळशी) असे मृत मजुराचे नाव आहे.बंजारे पत्नी सुनीताबाई यांच्यासह दुधाळे वस्ती येथे राहत होते. ३० ऑगस्टला रात्री ‘बाहेर जाऊन येतो,’ असे सांगून ते घराबाहेर पडले; मात्र परतले नाहीत. नातेवाइक, मित्रांनी परिसरात शोध घेऊनही ते सापडले नाहीत.
दरम्यान, दोन सप्टेंबरला दुधाळे वस्ती येथील तलावात बंजारे यांचा मृतदेह आढळला. तांत्रिक विश्लेषणातून दोन संशयित दिल्लीला गेल्याचे समोर आले. पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे यांच्या पथकाने तीन दिवस शोध घेतल्यानंतर गोपाल बिस्वास याला मुर्गा मंडी, गाझीपूर येथून ताब्यात घेतले. दुसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.