धावत्या पीएमपी बसला आग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
धावत्या पीएमपी बसला आग
शिवाजीनगर परिसरातून जात असलेल्या पीएमपी बसने शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतल्याची घटना घडली. बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे अग्निशामक दलाचे जवान सुरेश पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यासोबतच प्रसंगावधान राखून बसमधील चालक, वाहक आणि प्रवाशांना खाली उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली.

पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावर धावणारी पीएमपी बस शिवाजीनगर परिसरातून जात होती. त्या वेळी बसमधून अचानक धूर येत असल्याचे पवार यांनी पाहिले. पवार अग्निशामक दलाच्या कसबा पेठ केंद्रात रात्रपाळीवर होते. पाळी संपल्यानंतर ते पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील घरी दुचाकीवरून निघाले होते. बसला आग लागल्याचे लक्षात येताच पवार यांनी तातडीने अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी बसजवळ थांबून परिस्थिती हाताळली.
चालक, वाहकाची सावधगिरी

बसला आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पवार यांनी प्रसंगावधान राखून चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे खाली उतरविले. काही वेळातच अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. जवान सुरेश पवार यांनी वेळीच संभाव्य धोका ओळखून केलेल्या मदतीमुळे बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढता आले. त्यांच्या तत्परतेचे पीएमपी प्रवाशांनी कौतुक केले.