राज्यावर दुष्काळछाया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
serious drought shadow over the state stance of sharad pawar and chief minister devendra fadnavis
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यावर दुष्काळ छाया गडद झाली आहे. राज्यात पावसाची एकूण १७ टक्के तूट असून, मराठवाडा विभागात ती सर्वाधिक ३५ टक्के असल्याने हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. त्यावर, उपाययोजना सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून, टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हेही दुष्काळी दौरा करणार आहेत.

राज्यात पावसाची एकूण तूट १७ टक्के असून, एक जूनपासून १८ सप्टेंबरपर्यंत सोलापूरमध्ये सर्वाधिक ५७ टक्के तूट नोंदली गेल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मराठवाड्यात ३५ टक्के आणि विदर्भात २८ टक्के तूट नोंदली गेली आहे. कोकणात एकूण तूट १२ टक्के असली, तरी एकीकडे पालघरमध्ये अतिरिक्त पाऊस तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची ३५ टक्के तूट आहे. राज्यभरातच असमान पाऊस झाला असून, अनेक भागांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे चित्र आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत असताना राज्य सरकारनेही पावले उचलली आहेत.
‘केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने दुष्काळासंदर्भातील उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरूच आहे. शेतकऱ्यांना थेट मदत, पिण्याचे पाणी, चारा आदी सर्व उपाययोजनांचे नियोजन केले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ‘एनडीआरएफ’ अंतर्गत केंद्राची मदत घ्यायची आहे; परंतु पाच ऑक्टोबरनंतर पंचनामे सुरू करेपर्यंत न थांबता आताच त्याची तयारी सुरू केली आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

 संबंधित वृत्त... २

पाणीपुरवठा योजनांची तपासणी, दुरुस्ती आणि पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याचे निर्देश

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील भागांना भेट देऊन पिकांची पाहणी करणार.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अहवालाच्या आधारे पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निवारणासंदर्भात निर्णय घेणार.