The Direct Impact Of Tender Dispute On Ganesh Festival
निविदेच्या वादाचा फटका थेट गणेशोत्सवाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
महापालिकेतील साहित्य खरेदीच्या निविदेवरून सुरू असलेल्या वादाचा फटका आता थेट गणेश विसर्जन व्यवस्थेला बसला आहे. गणेशोत्सव सुरू होऊन दीड दिवस उलटला, तरी विसर्जित गणेश मूर्ती सुरक्षितपणे बांधून वाहून नेण्यासाठी आवश्यक ताडपत्रीचा क्षेत्रीय कार्यालयांना पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे पुढील विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्यांची सुरक्षित वाहतूक कशी करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. मूर्तींची विटंबना झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, अशीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट, हातमोजे, मास्क, चपला, जॅकेट, बकेट यांसह गणेश विसर्जनासाठी आवश्यक साहित्य पुरविण्यासाठी दर वर्षी जीईएम पोर्टलवरून निविदा काढली जाते. यंदा सुमारे आठ कोटी ८० लाख रुपयांची निविदा स्थायी समितीने मंजूर केली होती. मात्र, पुढील बैठकीत हा निर्णय रद्द करून, संबंधित वस्तूंची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याने प्रशासनाने पुन्हा वस्तू खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला. या प्रस्तावावर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपसूचना देण्यात आली. त्यानुसार जीईएम पोर्टलवरून केवळ ३० टक्के साहित्य खरेदी करायचे आणि उर्वरित साहित्याची नव्याने निविदा काढून महाटेंडर पोर्टलवरून खरेदी करायची आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.ताडपत्रीचा ठावठिकाणा नाही
पुण्यात गणेशोत्सवात सुमारे सहा लाख गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला सुमारे १५० ताडपत्रींसह झाडू, खराटे, फावडे, टिकाव, बकेट अशा ३२ प्रकारच्या हार्डवेअर साहित्याचा पुरवठा केला जातो. हौद किंवा टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती ताडपत्रीत सुरक्षित बांधून त्यांची विटंबना होणार नाही, याची काळजी घेतली जाते. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन झाले असून, आता पाचव्या दिवशीही हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. मात्र, साहित्य खरेदीच्या निविदेवरून सुरू असलेल्या वादामुळे ताडपत्री उपलब्ध नसल्याने विसर्जन व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ताडपत्री उपलब्ध नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विसर्जित गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने ताडपत्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी पत्रे मध्यवर्ती भांडार विभागाला पाठविण्यात आली आहेत. काही अधिकाऱ्यांनी थेट ठेकेदारांशी संपर्क साधून ताडपत्री पुरविण्याची विनंती केली. मात्र, वादाच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी साहित्य पुरविण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
‘गणेश विसर्जनासाठी ताडपत्रीची आवश्यकता असल्याने महापालिका अधिनियमाच्या ५-२-२ या नियमाखाली त्यांची खरेदी करावी, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटऐवजी स्वेटर दिले जाणार आहेत. हे निर्णय घेतल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. ज्या वस्तूंची तातडीची गरज आहे, त्या लगेच खरेदी केल्या जातील,’ अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केली.