व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे गणेश आरतीचा अनुभव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे गणेश आरतीचा अनुभव
खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये (पीआरसी) उपचार आणि पुनर्वसन घेत असलेल्या सुमारे ४५ सैनिकांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा अनुभव व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता आला. प्रत्यक्ष मंदिरात उपस्थित राहता येत नसतानाही बाप्पासमोर उभे असल्याचा अनुभव या तंत्रज्ञानामुळे सैनिकांना मिळाला.

सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल आर. के. मुखर्जी, ‘क्यूबिट’च्या शाल्वी पारगे या वेळी उपस्थित होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या सहकार्याने ‘क्यूबिट’ या तंत्रज्ञान कंपनीने हा उपक्रम राबविला. सैनिकांना व्हीआर हेडसेटच्या माध्यमातून ३६० अंशांच्या स्वरूपात आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या अनुभवात सहभागी झालेल्या सैनिकांनी आनंद व्यक्त केला. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नसले, तरी व्हीआर तंत्रज्ञानामुळे आपण बाप्पासमोरच उपस्थित असल्याची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या व्यक्तींनाही या अनुभवापासून वंचित राहावे लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. पीआरसीमधील सैनिकांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक होता,’ असे ‘क्यूबिट’च्या शाल्वी पारगे यांनी सांगितले.