दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दोन ठकबाजांनी वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पळ काढला. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगर परिसरात घडली. कुमींद्रपाल मुल्कराज मदान (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास कुमींद्रपाल यांच्या पत्नी सरला (वय ६०) या पूजा करून घरासमोर उभ्या होत्या. त्या वेळी दोन इसम त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही रॉयल कंपनीकडून आलो आहोत. कंपनी सोने, चांदी, पितळ आणि तांब्याचे दागिने चमकविण्यासाठी पावडर व लिक्विड बनवते. तुमच्याकडे दागिने असतील, तर आम्ही ते चमकवून देतो’, असे त्यांनी सरला यांना सांगितले. सरला यांनी त्यांना तांब्याचा गडवा आणि एका भांड्यात पाणी दिले. दोघांपैकी एकाने पाण्यात पावडर टाकली आणि त्यात तांब्याचा गडवा ठेवून तो चमकवून दाखविला. त्यानंतर त्यांनी सोन्याची वस्तू मागितली. सरला यांनी दीड लाख रुपये किमतीच्या ५० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या दिल्या.