शिरूर : शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांची हत्या करण्यात आली होती. शिरूर पोलिसांच्या पथकाने ४८ तासांत हा हल्ल्यातील तिन्ही संशयित आरोपींना सुपा टोलनाक्याजवळ सापळा रचून जेरबंद केले.
रोहित सोनवणे (२४, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत गव्हाणे (२३) आणि आदित्य पवार (१९, दोघे रा. गव्हाणेवाडी, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पैशांच्या वादातून रोहित सोनवणे याने गंगावणे यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपींवर यापूर्वीही जबरी चोरी, मारहाण आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक नितीन केनेकर पुढील तपास करीत आहेत.