फाइल गायब; उद्यानाचे बेहाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
फाइल गायब; उद्यानाचे बेहाल
प्रभाग क्रमांक ८मधील टिमकी परिसरातील बेघर निवाऱ्यासमोरील उद्यानाची दुरवस्था दूर करण्याचे काम सात महिन्यांपासून रखडले आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनदा पाहणी करून स्वच्छता केली. सिव्हिल वर्क आणि ग्रीन जिमसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासनही दिले; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य वसीम खान यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

खान यांच्या माहितीनुसार, मार्चमध्ये १० लाख रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या सिव्हिल वर्कसाठी तसेच सुमारे पाच लाख रुपयांच्या ग्रीन जिमसाठी फाइल तयार करण्यात आली होती. गेल्या महिन्यापर्यंत ही फाइल उपायुक्त राठोड यांच्या कक्षात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता चौकशी केली असता फाइल उपलब्ध नसून ती गहाळ झाल्याचे उद्यान विभागातून कळल्याचा दावा खान यांनी केला. ‘महापालिकेत नागरिकांच्या सुविधांशी संबंधित फाइल गायब कशा होतात,’ असा सवाल त्यांनी केला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उद्यानाचे दोन्ही लोखंडी गेट चोरीला गेले असून झोपाळे आणि ग्रीन जिमचे निम्म्याहून अधिक साहित्यही गायब आहे. अस्वच्छता, सुरक्षेअभावी नशा, मद्यपान, जुगार यांसारखे गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास महापालिका आणि उद्यान विभागाचा घेराव करण्याचा इशारा खान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दिला आहे.