नागपुरात पुलांचे अर्धशतक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नागपुरात पुलांचे अर्धशतक
‘उपराजधानीत ३५ उड्डाणपूल उभारण्यात आले असून पुढील काळात १५ पूल प्रस्तावित आहेत. या माध्यमातून नागपुरात पुलांचे अर्धशतक पूर्ण होऊन शहर वेगवान होईल. वेळ, इंधनाची मोठी बचत होईल’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंदोरा ते दिघोरी चौक या सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार गेव्ह आवारी, विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, संजय भेंडे, महापौर नीता ठाकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘नागपूर शहर भविष्याचा विचार करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले आहे, अशी कौतुकाची थाप विदेशी पाहुण्यांकडून मिळू लागली आहे. शाश्वत विकास नागपुरात बघायला मिळत आहे. पुढील काळात सांडपाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाणार नाही, अशी व्यवस्था उभी होत आहे. कचऱ्याचा आधुनिक प्रकल्प उभा राहत आहे. सीएनजी तयार होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रिटचे रस्ते तयार झाल्याने खड्ड्यांचा प्रश्न जवळपास संपुष्टात आला आहे. दर वर्षी रस्ते दुरुस्तीतून होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली. पाचव्या टप्प्यात आणखी सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. बाह्यवळण महामार्ग तयार होत आहे. १४८ किलोमीटरचा ‘गोल्डन आर्क’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवीन नागपुरातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.’

‘नव्या उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देणे हे महत्वाचे पाऊल आहे. दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नागपूरची ओळख आहे. ही ओळख नामकरणाच्या निमित्ताने दृढ होते. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अधुनिक पुलाला हेडगेवारांचे नाव देणे यात समर्पणाची भावना आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.