‘काजूपेक्षा शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘काजूपेक्षा शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा’
‘दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत कोणताही लोकप्रतिनिधी काजू व बदाम खाण्यासाठी गेला नव्हता. त्यामुळे यावरून वाद घालणे योय नाही. काजू, बदाम हा विषय महत्त्वाचा नसून, शेतकऱ्यांसाठी ही बैठक होती,’ असे सांगून मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी विरोधकांना फटकारले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नांदेडला दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या बैठकीत लोकप्रतिनिधींना काजू आणि बदाम दिल्याने वादंग निर्माण झाला. राज्यात दुष्काळ पडलाय आणि लोकप्रतिनिधी काजू, बदामवर ताव मारून शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत, अशी टीका विरोधक होत आहे. या टीकेचा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला.
‘कोणत्याही बैठकीत चहापाणी, काजू, बदाम दिले जातात. निरर्थक वाद निर्माण करू नये,’ असे आवाहन त्यांनी केले.

राज्य सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार, या प्रश्नावर त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक येते. केंद्र व राज्य सरकार मिळून हे काम करते. ३२ हजार कोटींची कर्जमाफी, वीजबील माफी दिली आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कसे घेता येईल, बी बियाणे कसे पोहोचवता येईल, हा प्रयत्न आहे; परंतु निसर्गाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत. अन्न धान्य, चारा आणि पाण्याची व्यवस्था करीत आहोत,’ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

‘विविध समाजांची आंदोलने सुरू आहेत. यामुळे समाज विभाजित होतो. ही अस्वस्थता खालपर्यंत जाते. आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एनडीआरएफ’चे काही नियम आहेत. त्यात परतीच्या पावसाच्या कधीपर्यंत पंचनामे करायचे हे ठरलेले आहे; परंतु त्यावर आम्ही थांबलेलो नाही. कृषिमंत्र्यांनी आज आढावा घेतला आहे. मी जालना आणि बीडमध्ये जाऊन पाहणी करणार आहे. पंचनामे आज आणि आठ दिवसांनी केल्याने फरक पडणार नाही. आम्ही आधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केले आहे,’ असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.