सीआयएसएफ जवान बनणार सायबर तज्ज्ञ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयआयटी कानपूरसोबत करार; पहिल्या बॅचमध्ये ४० जवान

सीआयएसएफ जवान बनणार सायबर तज्ज्ञ
विमानतळ, वीज प्रकल्प, अणुप्रकल्पांसह संवेदनशील आस्थापनांची सुरक्षा सांभाळणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान आता सायबर हल्ल्यांचा मुकाबला करण्याचे तंत्रही आत्मसात करणार आहेत. यासाठी नागपूरसह देशभरातून निवडलेल्या जवानांना आयआयटी कानपूरच्या सी३आय हबमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अभियंता दिनाचे औचित्य साधून सीआयएसएफ आणि आयआयटी कानपूर यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. करारावर सीआयएसएफ एमपीआरटीसी, बहरोडचे डीआयजी डॉ. सी. धनंजय नाईक आणि आयआयटी कानपूरचे अधिष्ठाता (आर अँड डी) प्रा. जयधरन जी. राव यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या प्रशिक्षणात क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स, सायबर हल्ल्यानंतरची तत्काळ कारवाई, डीपफेक, क्लाउड सुरक्षा आणि ऑपरेशनल टेक्नॉलॉजी अशा अद्ययावत विषयांचा समावेश असेल. विमानतळ, वीज व अणुप्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी जवानांना तयार केले जाणार आहे. विविध सायबर संकटांच्या परिस्थिती निर्माण करून त्यावर मात करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही दिले जाईल.

सीआयएसएफच्या माहितीनुसार, हा विशेष कार्यक्रम तीन वर्षांच्या आराखड्यानुसार राबवला जाणार आहे. प्रत्येक बॅचमध्ये ४० जवानांना सहा आठवड्यांचे मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाईल. टप्प्याटप्प्याने दलात सायबर सुरक्षेचे प्रशिक्षित जवानांचे सक्षम नेटवर्क तयार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आयआयटी कानपूरसोबत झालेल्या करारांतर्गत एमपीआरटीसी बहरोड येथे ड्रोन आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञानासाठी पाच वर्षांच्या आराखड्यावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार आहे. या केंद्रात जवानांना यूएव्ही ऑपरेशन, ड्रोन फॉरेन्सिक्स आणि मानवरहित प्रणालींच्या सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाईल. संशयास्पद ड्रोनची ओळख आणि विश्लेषणासाठी आरएफ रडार व मायक्रो-डॉपलर डिटेक्शनसारख्या तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन केले जाणार आहे. उंचावरील भागात ड्रोन ऑपरेशन्सशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर दिला जाईल.