भाषेला भौगोलिक सीमा नसते, हे सिद्ध करत नागपुरातील चिमुकल्यांनी आता दक्षिणेकडील समृद्ध कन्नड भाषा शिकण्याकडे पाऊल टाकले आहे. पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या वर्गांमध्ये आता ‘नमस्कारा’ म्हणजे नमस्कार आणि ‘नीवू हेगिद्दीरा?’ म्हणजे तुम्ही कसे आहात, असे कानडी शब्द गुंजणार आहेत. वसुंधरा समाज दर्पण संस्थेच्या ‘एक शाळा, एक भाषा’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत पाचव्या वर्गातील ५० विद्यार्थी वर्षभर या भाषेचे धडे गिरवणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कन्नड भाषेत सहज बोलणे, लिहिणे आणि वाचण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तज्ज्ञ शिक्षकांच्या ‘कन्नड कस्तुरी’ अभ्यास मंडळामार्फत हे वर्ग चालवले जात आहेत. नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळ्या प्रदेशाची आणि संस्कृतीची भाषा शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. या उपक्रमामुळे मुलांच्या भाषिक क्षमतेला नवा आयाम मिळेल, तसेच बालवयातच त्यांच्यात एकात्मतेची भावना रुजण्यास मदत होईल.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असा हा उपक्रम केवळ एका भाषेपुरता मर्यादित नाही. यापूर्वी संस्थेने प्रतापनगर विद्यालयात १२० विद्यार्थ्यांना बंगाली आणि सेवा सदन विद्यालयात ८० विद्यार्थ्यांना पंजाबी अर्थात गुरुमुखी भाषेचे धडे दिले आहेत. सलग पाच वर्षे चालणाऱ्या या योजनेतून भविष्यात मल्याळम, संस्कृत, तमिळ अशा अनेक भाषा नागपूरच्या इतर शाळांमध्ये पोहोचवण्याचा मानस आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसुंधरा समाज दर्पणचे सचिव चारुदत्त कहू, शिक्षक नरसिंह आचार्य, मनोज जोशी, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपिले, कार्यवाह उपेंद्र जोशी, मुख्याध्यापिका अंजली तिजारे आणि उपमुख्याध्यापिका कविता मोहरील यांचे सहकार्य लाभत आहे. लहान वयातच भाषांच्या या समृद्ध प्रवासात सहभागी होणारी ही मुले भविष्यात देशाच्या बहुभाषिक संस्कृतीचे दूत बनतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.