‘अमृत २’ अंतर्गत विकासकामांचा आढावा; मार्च २०२७ ची डेडलाइन
रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरणाच्या निकृष्ट कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अमृत २’ योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरात ‘अमृत २’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे, तसेच पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन या महत्त्वाच्या विषयांवर शनिवारी रामगिरी शासकीय निवासस्थानी आढावा बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.या वेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी वखरे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ‘अमृत २’ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण कामांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम व पुनर्भरणाच्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या. रिंग रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामांबाबतही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी वखरे यांनी पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
सिमेंट रस्त्यांवरील पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना कोणतीही तडजोड न करता शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. भविष्यात शहरातील रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेबाबत संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून सर्वसमावेशक व कडक धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्व कामांसाठी संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.