विमानतळ सुरक्षेसाठी नवी भिंत उभारणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

१५ किलोमीटर लांबी; आठ महिन्यांत पूर्णत्वाचे लक्ष्य

Maharashtra Times
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षाभिंतीचे काम सुरू झाले आहे. विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जुनी आणि अनेक ठिकाणी कमकुवत झालेली भिंत पाडून नवीन परिघीय सुरक्षाभिंत उभारण्याचे काम जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्टने हाती घेतले आहे. सुमारे १५ किलोमीटर लांबीची ही भिंत पुढील सात ते आठ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सोनेगाव भागात रस्त्याचे सिमेंटकरण झाल्यानंतर रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे ज्या ठिकाणी सुरक्षाभिंतीची उंची सुमारे आठ फूट असणे अपेक्षित होते, त्या ठिकाणी काही भागांत ती अवघी चार फूट राहिली होती. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब धोकादायक मानली जात होती. नव्या भिंतीची मूलभूत उंची आठ फूट असेल. त्यावर दीड फुटांचे काटेरी तारांचे कुंपण बसविण्यात येणार असल्याने भिंतीची प्रभावी उंची साडेनऊ फुटांपेक्षा अधिक होणार आहे. २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसात जुन्या सुरक्षाभिंतीचा काही भाग कोसळला होता. दीर्घकाळ हवामानाचा मारा सहन केल्याने भिंतीची स्थिती आधीच कमकुवत झाली होती. या घटनेनंतर सुरक्षाभिंत तातडीने बदलण्याची गरज अधोरेखित झाली होती. या पार्श्वभूमीवर हे बांधकाम सुरू झाले आहे.
विमानतळाच्या खासगीकरणानंतर आणि संचालनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जीएमआर समूहाने सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. १५ किलोमीटरहून अधिक लांबीची सुरक्षाभिंत नव्याने उभारणे ही केवळ दुरुस्ती नसून नागपूर विमानतळाची बाह्य सुरक्षा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. बाह्य सुरक्षा भक्कम झाल्यानंतर विमानतळाच्या अंतर्गत विकासकामांनाही वेग दिला जाणार आहे.