नागपूर : ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने गंभीर भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आराधनानगर येथे घडली. नर्मदाबाई गुलाबराव धांडे (वय ८४, रा. दर्शन कॉलनी, नवीन नंदनवन), असे मृत वृद्धेचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नर्मदाबाई यांची मुलगी वर्षा चौधरी (वय ५०) या आराधनानगर येथे राहतात. गेल्या काही दिवसांपासून नर्मदाबाई या मुलगी वर्षा यांच्याकडे राहायला आल्या होत्या. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. गुरुवारी दुपारी ऑक्सिजन घेत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यात नर्मदाबाई गंभीररीत्या होरपळल्या. त्यांना तत्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.