नागपूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई झालेला आरोपी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधून पसार झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. शेख समीर शेख, असे फरार आरोपीचे नाव आहे. खापरखेड्यातील टोळीयुद्ध प्रकरणात समीर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बुधवारी समीरने पोटात दुखत असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली. त्यानंतर त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक दहामध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी तो शौचालयात गेला आणि तेथील खिडकी तोडून पसार झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समीरविरुद्ध नवीन कामठी, कळमना, गणेशपेठ, तहसील, नंदनवन आणि खापरखेडा पोलिस ठाण्यांत खंडणी, लूटमार, शस्त्र बाळगणे यांसह १६ गुन्हे दाखल आहेत.