‘शिक्षण व्यवस्थेला फक्त ‘अंधभक्त’ हवेत’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘शिक्षण व्यवस्थेला फक्त ‘अंधभक्त’ हवेत’
इंदूर : ‘शिक्षण क्षेत्राला पोखरलेल्या ‘व्यवस्थेने’ देशाला आपल्या ताब्यात घेतले असून, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू नयेत, अशी तिची इच्छा आहे. व्यवस्थेला फक्त कथित अजेंडा आणि द्वेष पसरणारे ‘अंधभक्त’ हवेत,’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. इंदूरमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या युवा संवाद कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वात ते बोलत होते. ‘व्यवस्था विरुद्ध विद्यार्थी’ या विषयावर झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी ‘जेन झी’सह अन्य तरुणांशी शिक्षण, भरती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर संवाद साधला.

कार नाल्यात कोसळून सात जणांचा मृत्यू
आगर मालवा : मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात शनिवारी पहाटे कार नाल्यात कोसळल्याने ओडिशातील एकाच कुटुंबातील सात जणांसह कारचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नलखेडा शहरातील बगलामुखी मंदिराजवळ घडला. ओडिशातील भाविकांना घेऊन जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका नाल्यात कोसळली. यामध्ये तीन मुले व दोन महिलांसह गाडीतील सर्वांचा मृत्यू झाला.

इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

भुवनेश्वर : भुवनेश्वर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’मधील तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव डीएसव्ही विनय असे असून, तो मूळचा नागपूरचा रहिवासी होता. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

ईशान्य भारतात ४.९ तीव्रतेचा भूकंप

गुवाहाटी : ईशान्य भारतातील काही भागांना शनिवारी संध्याकाळी ४.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूतानमधील ग्येलपोझिंगपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आणि पाच किलोमीटर खोलीवर होता. या प्रदेशातील इतर ठिकाणांसह गुवाहाटीतही धक्के जाणवले.

‘भाजप आता

अखेरच्या टप्प्यात’

लखनौ : ‘भाजप आता अखेरच्या टप्प्यात असून, सत्तेतून जाण्यापूर्वी शक्य तितकी संपत्ती जमवण्याच्या प्रक्रियेत आहे,’ असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोग ‘विशेष’ आढावा घेऊ शकतो आणि याबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सौदी प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी

कोलंबो : सौदी अरेबियात अटकेत असलेल्या श्रीलंकेतील तमिळ युवकाच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करण्याची विनंती करावी, असे आवाहन श्रीलंकेतील विरोधी पक्षाच्या एका खासदाराने अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांना केले आहे. अनोजन शिवरासा असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर धर्मनिंदेचा आरोप आहे.