विभागात होणार चार ‘उमेद मॉल’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
launch of umed mall for social reform rural women to gain a foothold for progress
महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना हक्काची आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘ उमेद मॉल ’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारले जाणार आहेत. यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहांतील महिला उपजीविकेसाठी विविध लघुउद्योग करतात. या माध्यमातून खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्त्र उत्पादने, गृहउपयोगी साहित्य यांसह अनेक वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र या उत्पादनांना सातत्यपूर्ण बाजारपेठ उपलब्ध नसल्याने महिलांना विक्रीसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
यापूर्वी महिला बचतगटांना महालक्ष्मी सरस प्रदर्शने, आठवडी बाजार, तसेच उमेदमार्ट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यात येत होते. आता उमेद मॉलच्या माध्यमातून या उत्पादनांना स्थानिक पातळीवर स्वतंत्र विक्री केंद्र उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलच्या इमारती उभारण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर आता उर्वरित २१ जिल्ह्यांमध्ये मॉल उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत जागेच्या उपलब्धतेनुसार उमेद मॉल उभारले जाणार आहेत.

एखाद्या जिल्ह्यात मॉलसाठी जागा निश्चित झाली नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर असणार आहे.