Professor Protest Against Principal At Dr Ambedkar College
प्राचार्यांविरोधात प्राध्यापकांचा ठिय्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. दीपा पान्हेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्राध्यापक व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. बुधवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू कार्यालयात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.
डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थापन व प्राचार्य विरुद्ध प्राध्यापक-कर्मचारी असा संघर्ष सुरू आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीतील दोन गटांमधील वादाचीही याला किनार असल्याचे सांगितले जाते. या वादाचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन काही महिन्यांपासून थांबले आहे. प्राचार्य डॉ. पान्हेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे तक्रारी नोंदवून त्यांना प्राचार्यपदावरून हटविण्याची मागणी केली आहे.१५ सप्टेंबर रोजी उच्चशिक्षण सहसंचालकांकडे झालेल्या बैठकीतही कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या होत्या. त्या तक्रारींच्या प्रती व निवेदने बुधवारी प्र-कुलगुरूंना देण्यात आली. यावेळी महाविद्यालय विकास विभागाचे उपकुलसचिव राजेंद्र उदखेडे उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षापासून कार्यकारी प्राचार्यांच्या कार्यपद्धतीमुळे मानसिक त्रास, प्रशासकीय अपारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही अपेक्षित कारवाई झाली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या तक्रारींची विद्यापीठस्तरावर निष्पक्ष चौकशी करून योग्य प्रशासकीय निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. चर्चेदरम्यान डॉ. अविनाश फुलझेले यांच्या महाविद्यालयातील पुनर्रुजू होण्याच्या प्रकरणावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. विद्यापीठाने दिलेली मान्यता, त्यासाठी विचारात घेतलेली कागदपत्रे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या प्रशासकीय परिस्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. विद्यापीठात सिनेटसारखी वैधानिक संस्था अस्तित्वात असताना महाविद्यालयातील गंभीर तक्रारींची योग्य स्तरावर दखल का घेतली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्राध्यापकांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन बैठकीच्या ठिकाणी ते पोहोचले; मात्र सुरेई ससाई प्राध्यापकांना न भेटताच निघून गेले. वारंवार विनंती करूनही त्यांनी भेट घेतली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. चार-पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा कुलगुरूंची भेट घेऊन संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा तसेच सोमवारपासून महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. हा संघर्ष केवळ वेतनापुरता नसून डॉ. आंबेडकर महाविद्यालय व दीक्षाभूमीची प्रतिष्ठा, पारदर्शक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली.