गणेशोत्सवात गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीपासून ते विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत संपूर्ण परिसर विविध घोषणांनी दुमदुमत असतो. ‘एक, दोन, तीन, चार... गणपतीचा जयजयकार,’ ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ या आणि अशा अनेक घोषणा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. पण यंदा या पारंपरिक घोषणांना जेन-झी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिढीने एकदम आधुनिक स्वरूप दिले आहे. त्यामुळे ‘गणपतीचा जयजयकार’ या ऐवजी ‘बाप्पा आमचा सुपरस्टार,’ अशी घोषणाही ऐकायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे स्वरूप प्रचंड बदलले. हलत्या देखाव्यांच्या सजावटी मागे पडल्या आणि मोठमोठ्या महालांमध्ये गणराय विराजमान होऊ लागले. ताशापासून ढोल पथकांपर्यंत व्हाया बँजो-डीजे असा मिरवणुकीचाही प्रवास झाला. मात्र गेल्या काही वर्षांपर्यंत या मिरवणुकांमध्ये दिल्या जाणाऱ्या घोषणा कायम होत्या. आजही त्या घोषणांचा जोर कमी झाला नसला, तरी बदलत्या पिढीने त्यांच्या ‘लिंगो’मधल्या अनेक नवनव्या घोषणा आणून या संपूर्ण उत्सवाला आधुनिक टच दिला आहे.‘एक दोन तीन चार, बाप्पा आपले सुपरस्टार!’, 'इंडिया असो वा कोरिया, गणपतीबाप्पा मोरया!', ‘दहा रुपयांची फ्रूटी, बाप्पा आपले क्यूटी’, 'आयफोन असो की सॅमसंग, बाप्पा आपले हँडसम', ‘सोने चांदीचा वाढतो रेट, बाप्पा नेहमी अपटू डेट’, 'लाल फूल, पिवळे फूल, सजावट आपली ब्यूटीफुल', ‘एक प्लेट चार ग्लास, बाप्पाचा थाट फर्स्ट क्लास’, 'आयुष्यात करू सगळे ग्रो, बाप्पा आपले सगळ्यात प्रो', ‘कामाचा नाही घ्यायचा स्ट्रेस, बाप्पा करणार सगळ्यांना ब्लेस’, ' पेटीएम असो वा गुगल पे, बाप्पा करतात विघ्न स्ले', ‘चाय नाष्टा खारी, बाप्पा सगळ्यात भारी’, या आणि अशा अनेक नव्या घोषणांनी यंदाच्या उत्सवाचे रूपडे पालटले आहे.
‘या घोषणा देताना आम्हाला गणपतीबाप्पाचा अवमान करायचा नाही. पण आमच्यासाठी या घोषणा जास्त जवळच्या आहेत. त्यामुळे त्या लगेच लोकप्रिय झाल्या असाव्या,’ असे ठाण्यात राहणारा आणि सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असलेला वरद जोशी सांगतो. तर, मुलुंडला राहणाऱ्या प्रिया कुलकर्णीच्या मते या घोषणा भारी असल्या, तरी पूर्वीपासून दिल्या जाणाऱ्या घोषणांचा वापरही केला जातो. आम्हाला काही खोडून नवीन करायचे नाही, तर जुने सोबत घेऊनच पुढे जायचे आहे, असे ती सांगते.