Pune Culturethon 2026 Competition For Documenting Traditions For Ganesh Festival
परंपरांच्या दस्तऐवजीकरणासाठी स्पर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘गणेशोत्सवातील स्थानिक परंपरा , प्रथा, आठवणी, ध्वनी आणि सांस्कृतिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘ पुणे कल्चरथॉन २०२६ - गणेशोत्सव कल्चरल कॅप्चर चॅलेंज’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘विमल्ड्स पुणे’तर्फे ‘पुणे नॉलेज क्लस्टर’च्या सहकार्याने १७ ते ३० सप्टेंबरदरम्यान हा उपक्रम होणार आहे,’ अशी माहिती ‘विमल्ड्स’च्या अध्यक्ष सुचेता ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागरिक-विज्ञान आणि सांस्कृतिक संशोधनावर आधारित या उपक्रमात जगभरातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ, मुलाखती, कथा, आठवणी, लेख, रेखाटने आणि ऐतिहासिक साहित्य पाठवता येणार आहे. त्यासोबत त्या प्रथा किंवा परंपरेचा इतिहास, स्थानिक नाव, अर्थ, सांस्कृतिक संदर्भ आणि कालानुरूप झालेले बदल यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी आणि तरुणांनी ज्येष्ठांच्या घेतलेल्या मुलाखतींसाठी विशेष श्रेणी ठेवण्यात आली आहे; तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) गणेशोत्सवातील स्थानिक प्रथा, शब्द किंवा सांस्कृतिक संदर्भाबाबत विचारून त्यातील चुका शोधण्याचे आव्हानही देण्यात आले आहे.
योगदान मराठीसह कोणत्याही भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय भाषेत पाठवता येणार असल्याचे ढेरे यांनी या वेळी सांगितले.
नागरिकांनी माहिती www.pkc.org.in/culturalthon या संकेतस्थळावर जाऊन पाठवावी. गणेशोत्सवाशी संबंधित ही माहिती संकलित करून त्याचे संशोधन करण्यात येणार आहे. नागरिकांनी विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या संशोधनाचा अहवाल तयार करून तो प्रकाशित करण्यात येणार असल्याचे ढेरे यांनी सांगितले.