Fraud In Fruit Export From Egypt Trader Siphoned Off 25 Lakhs
इजिप्तवरून फळांचे कंटेनर; भूलथापा देऊन फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जळगाव येथील एका व्यापाऱ्याने फळाच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीला इजिप्तमधून आयात केलेले फळांचे तीन कंटेनर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळून कंपनीला फळे न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरत तुलसीदास लालवाणी असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार रजनीश कुमार राजपूत हा फळांच्या आयातीचा व्यवसाय करणाऱ्या वास्मी फार्म फ्रेश प्रा.लि. कंपनीत मॅनेजर आहे. या कंपनीची फसवणूक करणारा आरोपी लालवाणी हा जळगाव येथील श्री ॲग्रो कंपनीचा मालक आहे. एप्रिल २०२५मध्ये रजनीश कुमार याने लालवणी यांच्यासोबत ६३ लाखांचा व्यवहार पूर्ण केला होता. त्यामुळे रजनीशकुमार याचा विश्वास बसला. त्यानंतर लालवाणी याने रजनीश कुमार याला इजिप्तमधून संत्र्याचे तीन कंटेनर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत, ३० लाखांची रक्कम ॲडव्हान्स म्हणून घेतली होती. मात्र, मुदतीत लालवणी याने माल पुरवला नाही. तसेच रक्कमही परत केली नाही. रजनीश कुमार याने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर लालवणी याने पाच लाख रुपयांची रोख रक्कम रजनीश कुमार याला दिली. मात्र उर्वरित २५ लाखांची रक्कम परत केली नाही.