Four Special Express Trains For Ganesh Festival In Konkan
कोकणासाठी चार विशेष एक्स्प्रेस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने आणखी चार विशेष एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. पनवेल ते मडगाव मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. यामुळे नियमित आणि विशेष गाड्यांचे कन्फर्म तिकिटाची प्रतीक्षा असलेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष गाडीचे आरक्षण खुले झाले आहे.
गाडी क्र. ०१११३ पनवेल-मडगाव विशेष गाडी पनवेलहून २१ आणि २८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ ला मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी (०१११२) मडगावहून २० आणि २७ सप्टेंबरला रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी स. ९ वाजता पनवेलला पोहोचेल. विशेष रेल्वे गाड्यांना पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी येथे थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाडीमध्ये एक प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, सहा शयनयान आणि चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.मुंबई-पनवेल ते मडगावदरम्यान आणखी चार गणपती विशेष गाड्या जाहीर झाल्याने नियमित गाड्या वगळता विशेष गाड्यांची संख्या ३९४ वर पोहोचली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ६२ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. आरक्षित डब्यांचे आरक्षण सुरू झाले असून अनारक्षित डब्यांसाठी रेलवन ॲपवरून तिकीट घेण्याची मुभा आहे.