खांबातील वीजप्रवाहाने मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
खांबातील वीजप्रवाहाने मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा
गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या २६ वर्षीय करिष्मा माधवाणी या तरुणीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी अखेर सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सरकारी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजेच्या खांबाची वेळेवर देखभाल व दुरुस्ती न करणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करणे तसेच धोक्याची पूर्वसूचना देणारे फलक न लावल्याचा ठपका कंत्राटदारावर ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील गणेश गंगा अपार्टमेंट परिसरात १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.५० वाजता ही दुर्घटना घडली. याच परिसरात राहणारी २६ वर्षीय करिष्मा माधवाणी गणपती दर्शनासाठी जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या एका खांबाच्या संपर्कात आली. खांबामध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांकडून मध्यवर्ती पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही बसवणाऱ्या बेजबाबदार कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल करणाऱ्या मॅट्रिक्स स्मार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराकडून खांबाला करण्यात आलेल्या वीजपुरवठा यंत्रणेची आवश्यक वेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. तसेच खांबाजवळ धोकादायक स्थितीची सूचना देणारे कोणतेही फलक अथवा सुरक्षात्मक उपाय करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच खांबामध्ये विद्युतप्रवाह उतरल्याची बाब वेळीच लक्षात आली असती किंवा आवश्यक सुरक्षात्मक उपाय केले असते, तर दुर्घटना टाळता आली असती, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.