Severe Traffic Congestion For Passengers Returning From Konkan
परतीच्या प्रवासाला कोंडीचे विघ्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबई , पनवेल आणि उपनगरांकडे परतणाऱ्या मंडळींच्या प्रवासामध्ये वाहतूक कोंडी आणि रेल्वेतील गर्दीचे विघ्न आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या चार ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त आणि वाहतूक नियमन करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील एसटी स्थानकांवरही मुंबई आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. बसच्या प्रतीक्षेत लांब रांगा लागल्याने स्थानकांवरील गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील सापे-वामने स्थानकावरही प्रवाशांचे हाल झाले. योग्य उंचीचा फलाट नसल्याने जड सामानासह प्रवाशांना गाडीत चढताना कसरत करावी लागत आहे. विशेष गाड्यांना काही मिनिटांचाच थांबा असल्याने गर्दीत अनेकांना पायदानावर किंवा दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. शेड आणि मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.स्थानकाच्या विकासासाठी आणि फलाटासाठी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, कामाला अपेक्षित गती नसल्याने प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.