डेब्रिज टाकणाऱ्यांवर सिडकोची नजर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
डेब्रिज टाकणाऱ्यांवर सिडकोची नजर
गणेशोत्सवातील सुटीचा फायदा घेत मोकळ्या जागांवर डेब्रिज टाकणाऱ्या डेब्रिज माफियांविरोधात सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांत डेब्रिज वाहतूक करणारी नऊ वाहने जप्त करण्यात आली असून, सहा पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. खारघर, वाशी, रबाळे आदी भागांत ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील विकासकामांतून निर्माण होणाऱ्या डेब्रिज नवी मुंबई-पनवेल परिसरात टाकल्या जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकासह अभियांत्रिकी विभाग, वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या कारवाया केल्या जात आहेत. गुरुवारी, खारघर से. ३७ येथील मोकळ्या जागेत डेब्रिज टाकण्यापूर्वीच डंपरचालक लालला हुसेन शिपाई (५३, रा. कोपरा गाव) याच्यावर कारवाई करण्यात आली. अन्य घटनांमध्ये डंपरचालक आबेद शहानुर शेख (४४, रा. मुंब्रा, ठाणे), चालक जब्बार अहमद शेख (४३, रा. ओवे) यांनाही पहाटे ताब्यात घेण्यात आले.
डेब्रिज वाहतूक प्रकरणांत बहुतांश वेळा डंपरचालकांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, डंपरमालकांवर कारवाईबाबत सिडको आणि पोलिसांकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे.