आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या नेमबाजी मोहिमेला रविवारी दमदार सुरुवात झाली. यात मोलाचा वाटा राहिला तो अनुभवी नेमबाज एलावेनिल व्हालारिवनचा. तिच्या शानदार कामगिरीमुळे भारताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दोन रौप्यपदके जिंकली. अर्थात, वैयक्तिकसोबतच तिची सांघिकमध्येही सुवर्णसंधी हुकली.
२७ वर्षीय एलावेनिलने प्रथम सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले आणि नंतर वैयक्तिक प्रकारातही रौप्यपदक पटकावले. मात्र, वैयक्तिक पदकाची कामगिरी थोडीशी निराशाजनक ठरली. तमिळनाडूत जन्मलेली एलावेनिल अंतिम फेरीतील बहुतांश वेळ सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात तिची कामगिरी ढासळली. जपानच्या हिनाता ताइचीने संयमी कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या एलावेनिलने २५२.४ गुण मिळवले. सुवर्णपदक जिंकणाऱ्या ताइचीपेक्षा ती केवळ ०.६ गुणांनी मागे राहिली. ताइचीने २५३.० गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम नोंदवला. विद्यमान जागतिक विजेती आणि पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती दक्षिण कोरियाची बान ह्यो-जिन हिला २३०.४ गुणांसह ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. २०१८च्या जकार्ता आणि २०२२च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकापासून दूर राहिल्यानंतर एलावेनिलने प्रथमच वैयक्तिक आशियाई क्रीडा पदक जिंकले.अंतिम फेरीतील बहुतांश काळ एलावेनिलचे पूर्ण वर्चस्व दिसत होते आणि सुवर्णपदक तिच्या आवाक्यात असल्याचे जाणवत होते. १७वा शॉट घेतल्यानंतर कोरियाच्या बान हिच्यावर तिची १.४ गुणांची आघाडी होती, तर ताइची तिसऱ्या स्थानावर होती. २१व्या शॉटनंतरही एलावेनिल जपानी नेमबाजापेक्षा ०.२ गुणांनी पुढे होती. मात्र, दबाव वाढत गेला, तसे गुणांमधील अंतर कमी होत गेले. अखेरच्या दोन शॉट्सपूर्वी एलावेनिल ताइचीपेक्षा केवळ ०.३ गुणांनी मागे होती. तिने १०.४ गुणांचा शॉट घेतला. मात्र, जपानी नेमबाजाने १०.६ गुणांचा वेध घेऊन आपली आघाडी ०.५ गुणांपर्यंत वाढवली. एक शॉट शिल्लक असताना एलावेनिलला सामना फिरवण्यासाठी विशेष कामगिरीची गरज होती. तिने १०.१ गुण मिळवले. मात्र, ताइचीने संयम कायम ठेवून १०.२ गुणांचा वेध घेऊन सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रमही आपल्या नावावर केला.
लक्ष विचलित झाले
‘मी अव्वल तीनमध्ये असल्याचे कळले होते. त्यामुळे मी माझे पूर्ण लक्ष तंत्रावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मी थोडीशी निर्धास्त झाले आणि थोडे लक्ष विचलित झाले. अंतिम फेरीतील कामगिरीवर मला अजून काम करण्याची गरज आहे. अर्थात, रुपेरी यशाचा आनंद आहे,’ असे एलावेनिल म्हणाली. तमिळनाडूत जन्मलेल्या एलावेनिलसाठी हा निकाल गेल्या वर्षभरातील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ ठरले. शिमकेंट येथे झालेल्या २०२५च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्य जिंकले होते. नवी दिल्लीतील२०२६च्या स्पर्धेतही तिने हीच कामगिरी पुन्हा केली. आता घरी जाऊन जंगी सेलिब्रेशन करण्याचे तिने निश्चित केले आहे.
सोनम उत्तम मसकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणारी विदर्सा विनोद यांच्या साथीने एलावेनिलने भारताला नेमबाजीतील पहिले पदक मिळवून दिले. भारतीय त्रिकुटाने पात्रता फेरीत एकूण १८९८.० गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. चीनच्या वर्चस्वशाली संघाने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि पात्रता फेरीचा जागतिक विक्रम मोडला. चीनने गेल्या ऑगस्टमध्ये शिमकेंट येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत नोंदवलेला १९०२.० गुणांचा स्वतःचाच विक्रम मागे टाकला. जपानने १८९७.१ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या सोनमने भारताच्या कामगिरीचे नेतृत्व करून ६३४.१ गुण मिळवले. एलावेनिलने ६३३.५ गुणांसह सातवे, तर विदर्साने ६३०.४ गुणांसह १२वे स्थान मिळवले.