Environment friendly Ganesh Festival Pilankar Familys 96 year Tradition
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची शतकाकडे वाटचाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पर्यावरणपूरकतेचा संदेश देत आणि परंपरांचे जतन करत वसईतील पिळनकर कुटुंब यंदा घरगुती गणेशोत्सव ाचे ९६वे वर्ष अत्यंत उत्साहात साजरे करत आहे. पिळनकर कुटुंबाचा हा गणेशोत्सव केवळ वसईतच नव्हे, तर संपूर्ण परिसरात भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
या गणेशोत्सवाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे गणरायाची शाडूच्या मातीची आणि उजव्या सोंडेची मूर्ती. ही मूर्ती पिळनकर कुटुंबाला ९६ वर्षांपूर्वी दादर येथील समुद्रकिनाऱ्यावर मिळाली होती. त्यांचे आजोबा ही मूर्ती मोठ्या भक्तिभावाने घरी घेऊन आले. तेव्हापासून आजतागायत या मूर्तीचे विसर्जन करण्यात आलेले नाही. गेल्या पाऊण शतकाहून अधिक काळ ही मूळ माती तशीच जपण्यात आली आहे. मूर्तीचे पावित्र्य आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कुटुंब दर दोन ते तीन वर्षांनी याच मूर्तीला अतिशय सुरेख असे रंगकाम करते. त्यानंतर दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान या गणरायाची स्थापना करण्यात येते. यंदाही अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.उत्सवाचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे दरवर्षी येथे साकारण्यात येणारे चलचित्र. पिळनकर कुटुंबाने मागील २५ वर्षांपासून चलचित्र देखावा साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा ‘गोवर्धन पर्वत’ उचलून धरलेल्या भगवान श्रीकृष्णाचा नयनरम्य देखावा त्यांनी साकारला असून हा डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा पाहण्यासाठी आणि गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी वसई व आजूबाजूच्या परिसरातून सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने येतात. हा उत्सव केवळ एका धर्मापुरता मर्यादित न राहता, सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.
‘हा उत्सव आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा आहे. आजोबांनी सुरू केलेली ही परंपरा आजची आमची तिसरी पिढीही तितक्याच श्रद्धेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पुढे चालवत आहे. गणरायाची मूर्ती ही आमच्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे,’ असे कुटुंबातील सदस्य दीपक पिळनकर आणि दिलीप पिळनकर यांनी सांगितले. संपूर्ण पिळनकर कुटुंब एकत्र येऊन, पर्यावरण आणि संस्कृतीचा मेळ घालत हा उत्सव दरवर्षी अधिक देखणा करत आहे. ९६ वर्षांची प्रदीर्घ परंपरा, समुद्रातून लाभलेली, गोवर्धन देखावा आणि पर्यावरण रक्षणाचा दिलेला संदेश, यामुळे पिळनकर कुटुंबाचा हा गणेशोत्सव वसईच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालत आहे.