Historic Victory For Indias Womens Cricket Team Shefali Vermas Century
शेफालीचे शतक; भारत अंतिम फेरीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शेफाली वर्माच्या आक्रमक शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील टी-२० क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर ११४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्यपदक निश्चित केले. भारताची आता विजेतेपदासाठी श्रीलंकेविरुद्ध लढत होईल. गेल्या आशियाई स्पर्धेत हेच दोन संघ आमनेसामने आले होते. श्रीलंकेने पाकिस्तानवर मात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९५ धावांपर्यंत मजल मारली. शेफालीने अवघ्या ४९ चेंडूंत नाबाद १०० धावांची खेळी करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. तिच्या शतकी खेळीत नऊ षटकार व तीन चौकारांचा समावेश होता. भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव सुरुवातीपासूनच विस्कळित झाला. ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने बांगलादेशचा डाव १५.४ षटकांत अवघ्या ८१ धावांत गारद झाला. धावांच्या फरकाने बांगलादेशविरुद्ध भारताचा हा दुसरा सर्वांत मोठा विजय ठरला. भारताकडून दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ४ बाद १९५ ( शेफाली वर्मा नाबाद १००, स्मृती मानधना ३७, हरमनप्रीत कौर ४०, संजिदा अख्तर मेघ्ला ४-०-२५-१) वि. वि. बांगलादेश - १५.४ षटकांत सर्व बाद ८१ (दिलारा अख्तर २७, सुलताना खातून नाबाद १२, क्रांती गौड ३-०-२०-१, नंदनी शर्मा ४-०-२५-३, श्री चरणी ३-१-७-२, श्रेयांका पाटील ३-०-२२-१, दीप्ती शर्मा २.४-०-७-३).