भारतीय संघाचीविजयी घोडदौड कायम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian chess teams astounding performance victory over netherlands
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत).

समरकंद येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पाचव्या फेरीत आर. प्रज्ञानंद आणि जगज्जेता डी. गुकेश यांनी चित्तथरारक लढतीत भारतीय पुरुष संघाला बलाढ्य नेदरलँड्स संघाविरुद्ध ३-१ असे विजयी करून आपली घोडदौड सुरू ठेवली. सन २०२४मध्ये बुडापेस्ट ला पोलंडशी हरलेल्या अग्रमानांकित भारतीय महिला संघाला मात्र पोलंडच्या संघाने पुन्हा एकदा २.५-१.५ असे पराभूत केले. मात्र, महिला संघाच्या पराभवामागे एक आशेची झालर आहे; कारण बुडापेस्ट २०२४ मध्ये याच पोलिश संघाशी हरल्यावर भारतीय महिला संघाने जोरदार खेळ करून सुवर्णपदक खेचून आणले होते.
अर्जुन एरिगेसीने थोडा वेळ भारतीय गटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते; पण त्याने यॉरडेन व्हॉन फॉरिस्टशी प्यादे कमी असतानाही बरोबरी साधली. निहाल सरीनने शांतपणे बरोबरी साधली. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष प्रज्ञानंद आणि गुकेशकडे लागले. प्रज्ञानंदची लढत अनिश गिरीशी होती. प्रज्ञानंदने त्याला जराही संधी न देता अप्रतिम चाली करून डाव खिशात घातला. जगज्जेत्या गुकेशने वेळ कमी असतानाही अचूक चाली करून एर्विन ल आमीला पराभूत केले.

महिलांमध्ये कोनेरू हम्पीने पोलंडच्या ओलिविया किओल्बासाविरुद्ध धोका न पत्करता २७ चालींत बरोबरी मान्य केली. वंतिका अग्रवालने अनुभवी ग्रँडमास्टर मोनिका सॉकोला रोखण्यात यश मिळवले. दिव्या देशमुखने गेल्या वर्षीच्या पोलिश विजेत्या क्लॉडिया कुलॉन विरुद्ध दमदार सुरुवात केली होती. मात्र, प्रखर झुंजीनंतर दिव्याने बरोबरी साधली. वैशालीला मात्र अजून आपली लय सापडलेली नाही. रशिया सोडून पोलंडकडून खेळणाऱ्या अलेक्झांडरा मालत्सेवस्काया बरोबर तिने एक प्यादे गमावले आणि त्यानंतर अलेक्झांडरा ने योग्य त्या खेळ्या करून वैशालीला डोके वर काढायची संधी दिली नाही. पाचव्या फेरीत दोन्ही गटांत अग्रमानांकित संघ हरल्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे.

(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत).