मार्शल आर्ट्समध्ये सुचिकाचे ब्राँझपदक निश्चित

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मार्शल आर्ट्समध्ये सुचिकाचे ब्राँझपदक निश्चित
भारताच्या सुचिका तिरियालने रविवारी मंगोलियाच्या अल्तानचिमेग बायगलमाचा २-० असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्सच्या ६० किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह तिचे किमान ब्राँझपदक निश्चित झाले आहे.

३६ वर्षीय अनुभवी सुचिकाने ज्युदो, कुराश, जिऊ-जित्सू आणि आता एमएमए अशा विविध क्रीडा प्रकारांत कारकीर्द घडवली आहे. तिची उपांत्य लढत आज, सोमवारी होणार आहे. आयची-नागोया आशियाई स्पर्धेत ‘एमएमए’ या मार्शल आर्ट्स प्रकाराचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
सुचिकाने २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये, तर २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराशमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०२४मध्ये ती जिऊ-जित्सूची जागतिक विजेती ठरली. क्रीडा क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर मित्रांच्या प्रोत्साहनामुळे सुचिका पुन्हा स्पर्धेत परतली आणि तिने एमएमए हे नवे आव्हान स्वीकारले.

वयाच्या १२व्या वर्षी छेडछाडीच्या एका घटनेनंतर सुचिकाने प्रतिकार करायला शिकण्याचा निर्णय घेतला. तिथून सुरू झालेला प्रवास पदकापर्यंत येऊन पोहोचला आहे. सुचिकाचा प्रवास हरियाणातील ज्युदोच्या मॅटपासून सुरू झाला होता. महिलांच्या पारंपरिक ‘एमएमए’च्या प्रकारात प्रतिस्पर्ध्यावर प्रहार, टेकडाउन, पकड आणि जमिनीवरील लढाई यांचा समावेश असतो.

मुंबईत सराव

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सुचिकाने मुंबईत प्रशिक्षक निखिल आणि शुभोभन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आठवड्यांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. ‘मुंबईच्या वाहतुकीमुळे प्रवास करताना मला अडचणी येत असत. त्या वेळी माझे प्रशिक्षक माझी वाट पाहत असत, जेणेकरून मी येऊन प्रशिक्षण पूर्ण करू शकेन. त्यांनी माझ्याकडे पूर्ण लक्ष दिले आणि माझ्या तंत्रात सातत्याने सुधारणा केली. माझ्या सहकाऱ्यांनी आणि सरांनी मला चांगले पाठबळ दिले. तयारीदरम्यान मला दुखापत होऊ नये, याचीही त्यांनी काळजी घेतली,’ असे तिने सांगितले. त्यामुळे तिच्या यशात महाराष्ट्राचाही वाटा आहे.

भारताचा मिश्र मार्शल आर्ट्सपटू वरुण सन्यालला रविवारी एकही सामना न खेळता आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. क्रूझवरील निवासस्थानी सौना सत्रादरम्यान अतिथकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे तो बेशुद्ध पडला. रविवारच्या सामन्यासाठी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. २७ वर्षीय सन्यालचा पुरुषांच्या पारंपरिक ७७ किलो गटातील उपांत्यपूर्व सामना रविवारी होणार होता. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. त्याची प्रकृती स्थिर आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या व्यवस्थापनातील गोंधळामुळे अनेक खेळाडूंना त्रास झाला. त्यात सन्यालचाही समावेश होता. खोल्या मिळेपर्यंत ८ ते १० तास अन्नाविना थांबावे लागले होते. या त्रासाचा रविवारी त्याच्या प्रकृती बिघडण्यामध्ये काही संबंध होता का, हे स्पष्ट झालेले नाही.