देखाव्यात साकारला ‘नवरसां’चा प्रयोग!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
unique experiment of navras in ganesh festival
गणरायाला ६४ कलांचे अधिपती मानले जाते. त्यातीलच एक असणाऱ्या नाट्यकलेचा अनोखा प्रयोग घरगुती गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे. भाईंदरच्या पाटील कुटुंबाने शृंगार, हास्य, करुणा, रौद्र तसेच शौर्याचा वीर, भीतीचा भयानक, तिरस्काराचा बीभत्स, आश्चर्याचा अद्भुत आणि समाधानाचा शांत अशा नवरसांना नऊ गाजलेल्या मराठी नाटकांची जोड देत देखावा उभारला आहे. त्यामुळे गणरायाच्या दरबारात जणू रंगभूमीच अवतरल्याचा अनुभव भाविकांना मिळत आहे.

भाईंदरच्या नवघर भागात संतोष पाटील यांच्या कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. संतोष यांना सजावट आणि नावीन्यपूर्ण कलाकृती साकारण्याची विशेष आवड आहे. त्यामुळे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते आणि त्यांचे कुटुंबीय गणरायाच्या आगमनाच्या तब्बल दोन महिने आधीच देखाव्याच्या तयारीला सुरुवात करतात. आजवर त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा, वारीतील रिंगण सोहळा, तुकाराम बीज सोहळा आणि इतर विविध विषयांवर देखावे साकारले आहेत.
यंदा नाट्यकलेला केंद्रस्थानी ठेवून नवरस आणि मराठी रंगभूमीचा परिचय भाविकांना करून देण्यासाठी देखावा साकारण्यात आला आहे. यात शृंगाररसासाठी प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. हास्यरसासाठी खळखळून हसवणारे ‘हसवा फसवी’, तर करुणरसासाठी भावनिक विश्व उभे करणारे ‘नटसम्राट’ साकारण्यात आले आहे. रौद्ररसाला संतापाची धार देण्यासाठी ‘कट्यार काळजात घुसली’, तर वीररसातून शौर्य आणि पराक्रम दाखविण्यासाठी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची मांडणी करण्यात आली आहे.

या पद्धतीने नाटकातील नवरस आणि मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांची सांगड घालत एकाच सजावटीत नऊ वेगवेगळे प्रसंग उभे करण्यात आले आहेत. नाट्यकलेच्या माध्यमातून गणेशोत्सवात काहीतरी वेगळे सादर करण्यासोबतच मराठी रंगभूमीची ओळख नव्या पिढीला व्हावी, हा यंदाच्या देखाव्यामागील मुख्य उद्देश आहे. गाजलेल्या नाटकांमधील प्रसंग आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांचा परिचय भाविकांना व्हावा, यासाठी नवरसांची ही संकल्पना निवडली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना

पाटील कुटुंबाकडून पीओपी मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मागील अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा जपली जात आहे. दरवर्षी तयार करण्यात येणारा देखावा पुढील वर्षी वापरासाठी दुसऱ्या घरी दिला जातो. म्हणजेच त्याचा पुनर्वापर केला जात असून, प्लास्टिक किंवा थर्माकोलसारख्या वस्तूंचा वापर केला जात नाही.