Urgent Meeting On Drought Demand For Financial Aid To Farmers
दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : ‘राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना किमान २५ हजार रुपये मदत देण्याची मागणीही केली आहे.रोहित पवार यांनी १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही उपाययोजनांची मागणी केली असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. ‘दुष्काळ राजकीय विषय नसून, महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन यावर चर्चा व्हावी,’ असेही ते म्हटले आहेत.