शिकागोत मुंबई-पुण्याइतकीच रंगत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना; सार्वजनिक मंडळांत ढोल-ताशांचा गजर

शिकागोत मुंबई-पुण्याइतकीच रंगत
सार्वजनिक गणेशोत्सवही दिमाखात

बई-पुण्यात गणेशोत्सवाची चाहूल लागताच जशा बाजारपेठा फुलांनी, मखरांनी आणि सजावटीच्या साहित्याने बहरून जातात, तसाच उत्साह अमेरिकेतील शिकागोमध्येही अनुभवायला मिळतो. घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना, उकडीचे मोदक, गौरीपूजन, ढोल-ताशे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी परंपरा जपत साजरा होणारा गणेशोत्सव हा तेथील भारतीय समुदायाला एकत्र आणणारा मोठा सांस्कृतिक सोहळा झाला आहे. मूळच्या मुंबईकर आणि सध्या शिकागोमध्ये वास्तव्यास असलेल्या कल्पना गोडसे नेकलीकर यांनी तेथील गणेशोत्सवाचे हे चित्र उलगडले.
गणेशोत्सवाच्या काही आठवडे आधीपासूनच भारतीय दुकानांमध्ये गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तू मिळू लागतात. भारतातून जहाज किंवा विमानाने मूर्ती आणल्या जातात. शाडूच्या मूर्ती मर्यादित प्रमाणात मिळत असल्या तरी मातीच्या मूर्ती सहज उपलब्ध होतात. अनेक जण ऑनलाइनही गणपती मागवतात. न्यू जर्सी, डॅलस आणि शिकागोमधील भारतीय दुकानांमध्ये गणेशमूर्तींसह संपूर्ण पूजेचे साहित्य मिळते.

घरगुती गणपतींसाठी दोन-तीन आठवडे आधीपासून तयारी सुरू होते. एखाद्या संकल्पनेवर आधारित देखाव्याचे सजावट साहित्य विकत मिळू शकते. त्या आधारे अनेक कुटुंबे स्वतः देखावे तयार करतात. मुलांना हस्तकलेची कामे, रंगकाम, चिकटकाम अशा कामांत सहभागी करून गणेशोत्सवामागील संस्कार आणि परंपरा समजावून सांगितल्या जातात. कल्पना यांच्या घरी त्यांचे पती सौरभ, त्यांची मैत्रीण सुप्रिया, योगेश, श्रद्धा असे सगळे मिळून तीनेक आठवडे आधी देखाव्याचे नियोजन सुरू करतात. त्यांनी हॅरी पॉटर, लाल किल्ला, किक्रेट असे देखावे घरी तयार केले आहेत.

उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, माव्याचे मोदक आणि इतर पारंपरिक प्रसाद घराघरांत तयार केले जातात. आता माव्याचे, आंब्याचे मोदकही, पेढे सहजपणे मिळतात. गणपती दर्शनासाठी एका दिवशी पाच-सहा घरांना भेट देण्याची लगबगही मुंबईसारखीच असते. त्यानंतर गौरींचेही मोठ्या उत्साहात आगमन होते. उभ्या गौरी, महालक्ष्मी, खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी ही परंपरा शिकागोतही पाहायला मिळते.

अमेरिकेत गणेशोत्सवासाठी सार्वजनिक सुट्टी नसल्याने अनेक जण आधीच सुट्टीचे नियोजन करतात. काही वेळा तर नवीन वर्षाचे कॅलेंडर आल्या आल्या गणेशोत्सवासाठी सुट्यांची नोंद केली जाते. मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि विसर्जनावेळी पाणावणारे डोळे शिकागोतील गणेशोत्सवामध्ये मायभूमीचीच आठवण करून देतात.

सार्वजनिक गणेशोत्सवही दिमाखात

शिकागो महाराष्ट्र मंडळ, लेक काउंटी मंदिर तसेच नेपरव्हिल, शॉम्बर्ग आणि इतर भारतीय वस्त्यांमधील सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्या दिमाखात साजरे होतात. मोठी मंदिरे किंवा अगदी मॉलमध्येही गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. ढोल-ताशा पथकांची दीड-दोन महिने आधीपासून तयारी सुरू होते. भरतनाट्यम, कथ्थक, भजन, गाणी आणि मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. काही ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो तर जिथे एखादी जागा भाड्याने घेऊन गणेशोत्सव साजरा केला जातो, तिथे त्या-त्या ठिकाणच्या कायद्यानुसार विसर्जन केले जाते, असे कल्पना यांनी सांगितले. स्थानिक मराठी शाळांमध्येसुद्धा हा सण साजरा केला जातो. मुलांना गणपतीची चित्रे काढायला सांगतात किंवा त्यांनी साकारलेली मूर्ती शाळेत नेली जाते. शाळेत आरतीही होते.