नर्मदेकाठी आज ‘राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीबाहेर प्रथमच सोहळ्याचेआयोजन

नर्मदेकाठी आज ‘राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा
केवाडिया : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृती, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज, मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवाडिया येथील एकता नगरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडणार आहे. याआधी राष्ट्रीय पुरस्कार सोहळा प्रामुख्याने राजधानीपुरता मर्यादित होता. मात्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या धोरणात्मक निर्णयानुसार यंदा हा ऐतिहासिक सोहळा नर्मदेच्या काठी रंगणार असून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे दर्शन घडवणार आहे.

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रासाठीही अभिमानाचे अनेक क्षण आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जाहीर झाला असून ‘घरत गणपती’ चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सन्मान मिळणार आहे.
मराठी-इंग्रजी पट ‘भंगार’ने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वाची मान उंचावली आहे. १९५४ पासून सुरू असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गेल्या सात दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता, तांत्रिक दर्जा आणि भाषिक वैविध्याचा गौरव केला आहे. यंदा ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला आहे; तसेच ‘ब्रह्मयुगम’साठी मामूटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान केला जाईल.

‘आर्टिकल ३७०’साठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार आहे, तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी रणदीप हुडा याला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ‘कल्की २८९८ एडी’, ‘अमरन’, ‘पुष्पा: द रुल पार्ट-२’, ‘भूल भुलैया ३’ आणि ‘स्त्री २’ यांसह अनेक चित्रपटांना विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकात जन्मलेल्या अनंत नाग यांनी सत्तरच्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘संकल्प’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, तर ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. सहा भारतीय भाषांतील ३००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. २०२५मधील पद्मभूषण सन्मान त्यांच्या समृद्ध कारकिर्दीची साक्ष देतात.