11 day Shiv Era Ganesh Festival Begins In Odhavanagar
ओधवनगरमध्ये अवतरला शिवकाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बोरिवली पूर्वेकडील ओधवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाची संकल्पना ‘ शिवकालीन काळ ’ अशी ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा देखावा उभारला आहे. गेली २४ वर्षे सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाने यंदा प्रथमच ११ दिवस गणरायाला विराजमान केले आहे.
शिवकालीन वातावरणाची अनुभूती देणारा हा संपूर्ण देखावा मराठी सिनेसृष्टीतील आर्ट डायरेक्टर महेश कुडाळकर यांनी साकारला आहे. देखाव्यातील बारकावे आणि शिवकालीन वातावरणामुळे तो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा देखावा पाहण्यासाठी बोरिवलीसह दूरवरूनही नागरिक येत असून, यंदा पहिल्या चार दिवसांतच गेल्या २४ वर्षांच्या तुलनेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निषाद कोरा यांनी सांगितले.२१ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित संगीतमय नाट्याविष्कार तसेच, प्रख्यात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. आगमन सोहळाही पारंपरिक पद्धतीने पार पडला असून, विसर्जन सोहळाही त्याच पद्धतीने करण्याचे नियोजन आहे.
यंदा प्रथमच ११ दिवसांचा गणरायाचा उत्सव होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवकालीन अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मंडळाला भेट देत आहेत. मंडळाचे अध्यक्ष सचिन गाडगीळ, सचिव उमेश निकम, खजिनदार निखिल जोग यांच्यासह संस्थापक मंगेश जोग, अरुण मोयली, संदीप जगताप आणि अनिल फाटक हे उत्सवाच्या आयोजनात सहभागी आहेत.